दिनांक: 12 मे 2016
नागरी सेवांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर
- अनूप कुमार
युपीएससीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर, दि. 12 : जनतेला कमी वेळात अधिकाधिक सेवा देण्यासाठी नागरी सेवा विभाग हा जनतेचा आणि शासनाचा दुवा म्हणून काम करतो. नागरी सेवांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा व दररोज होणाऱ्या घडामोडींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. यामुळे शासनाच्या कामकाजात पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण झाली आहे, असे मत विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आज एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
वनामतीच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी वनामतीचे महासंचालक नवीन सोना उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या डॉ. सिद्धेश्वर बोंदरे आयएएस 124 रॅकिंग, अक्षय पाटील आयआरएस रॅकिंग 344 व श्रीमती संघमित्रा खोब्रागडे आयआरएस रॅकिंग 832 या तीघांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, अशा स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल व राज्यातील विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी गंभीर आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रभावशाली प्रशासन या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचा आाय. टी. क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात कल असून यासाठी मोबाईल इंटरनेट, फेसबुक, व्टिटरवर प्रत्येकाने अपडेट राहिले पाहिजे. लोकांच्या शासनाच्या प्रती आकांक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून लोकांना त्यांची कामे शासन दरबाबरी हेलपटा न मारता वेळेवर भ्रष्टाचार मुक्त झाली पाहिजेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शासकीय कामकाजात पारदर्शकता येवून गतिमानता वाढली असून जनतेचा प्रशासनातील सहभाग वाखणण्यासारखा आहे. लोकांनी ऑनलाईन केलेल्या तक्रारी अथवा अर्जाची सद्य:स्थितीची मोबाईलवर ई-तिकिटांची प्रत दाखविल्यास ती ग्राह्य धरण्यात येते. प्रत्येक शासकीय विभाग आता फेसबुकवर, व्टिटर, व्हाट्स ॲप ग्रुपने जनतेशी जोडलेला आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आताच्या व पूर्वीच्या शासकीय काम करण्याच्या पद्धतीत खूप महत्त्वपूर्ण बदल झालेले असून त्याबाबत त्यांनी अनेक उदाहरणे देवून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
ते पुढे म्हणाले की शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी व कमी वेळात जनतेची कामे होण्यासाठी परंपरागत सुरु असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अजूनही बदल करण्याची गरज असून ते काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने होवू शकते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
****



